गेल्या दोन दिवसांपासून रायगड, मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणातील काही भागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. हवामान विभागाने आज बुधवार १९ जुलै रोजी, मुंबई ठाणे ह्या शहरांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर केला आहे.
रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून शहरांमधील सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे, गावागावांतील संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आज १९ जुलै रोजी सुट्टी देण्यात आली आहे.
खालापूर तालुक्यात सुमारे २५४ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून तेथील पाताळगंगा नदी २१.२० मी पातळी पर्यंत पोहोचली आहे. ह्या नदीने इशारा पातळी ओलांडली आणि लवकरच नदी धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे. महाडमधील सावित्री नदीदेखील दुथडी भरून वाहत आहे. सावित्री आणि तिच्या उपनद्यांची पाणी पातळी वाढल्याने काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कर्जत तालुक्यात वाहणारी उल्हास नदी पूर पातळी गाठण्याच्या स्थितीत आहे. उल्हास नदीने अनेक गावांमधील पुल ओलांडले आहेत.
ह्या सर्व नदी परिसरातील लोकांना सावधान करण्यात आले असून गरज भासल्यास एनडीआरएफ (NDRF) ची टीम लवकरच येथील लोकांचे स्थलांतर सुरू करेल. तरीही पुढील २४ तास पावसाचा जोर कायम राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
© Copyright 2023. All Rights Reserved Powered by Vygr Media